लोहारा (प्रतिनिधी) : लोहारा तालुक्यातील फणेपूर गावातील शेतकऱ्यांची अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली मागणी अखेर पूर्ण झाली आहे. गावासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला शासनाने मंजुरी दिली आहे. शिवसेनेचे उपनेते तथा माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी या सोसायटीच्या मंजुरीसाठी गेल्या तीन वर्षांपासून केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून, या निर्णयामुळे फणेपूरच्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
तीन वर्षांच्या पाठपुराव्याला यश
फणेपूर गावात स्वतंत्र विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी स्थापन व्हावी, ही शेतकरी आणि ग्रामस्थांची अनेक वर्षांपासूनची मागणी होती. या मागणीची दखल घेत माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी सोसायटीच्या मंजुरीसाठी पुढाकार घेतला. राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची वेळोवेळी भेट घेणे, निवेदन व पत्रव्यवहार करणे आणि संबंधित स्तरावर सातत्याने पाठपुरावा करणे, अशा प्रयत्नांतून त्यांनी हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले.
अखेर शासनाकडून सोसायटीला मंजुरी मिळाल्याने गावातील शेतकऱ्यांच्या दीर्घकालीन मागणीला मूर्त स्वरूप आले आहे. सहकारी संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना संस्थात्मक पातळीवर सुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा होण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.
ग्रामस्थांकडून चौगुले यांचा सत्कार
सोसायटीला मंजुरी मिळवून देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल फणेपूर ग्रामस्थांच्या वतीने माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानत आनंद व्यक्त केला.
या सत्कार सोहळ्याला शिवसेनेचे उमरगा तालुकाप्रमुख बळीराम सूर्यवसे, सेवानिवृत्त शाखा अभियंता राजेंद्र माळी, उपसरपंच दत्तात्रय काळे, माजी सरपंच नारायण निंगशेट्टी, सचिन करे, नागेश पाटील, महेश मड्डे, व्यंकट माळी, राजकुमार सगर, शब्बीर मुल्ला, नरगिश मुल्ला, संजय निंगशेट्टी, शेषाबाई बंडगर, छायाबाई भिसे, शंकर स्वामी, यादव जाधव यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे चेअरमन, शेतकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फणेपूर गावासाठी सहकारी सोसायटीच्या मंजुरीचा निर्णय महत्त्वपूर्ण ठरला असून, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली मागणी पूर्ण झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.