तरुणांनो उद्योगाकडे वळा – डॉ. सय्यद अझरूद्दीन

लोहारा : म. शि. प्र. मंडळाचे भानुदासराव चव्हाण महाविद्यालय, लोहारा या ठिकाणी पदवी वितरण समारंभ, माजी विद्यार्थी आणि पालक मेळावा अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमख अतिथी आणि बीजभाषक म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथील वाणिज्य विभागप्रमुख प्रोफेसर सय्यद अझरुद्दीन यांची उपस्थिती होती.
व्यासपीठावर संस्थेचे सरचिटणीस आ. सतीश चव्हाण, महाविद्यालय विकास समितीचे किशोर साळुंके,इंगळे, देवगिरी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. एन. जी. गायकवाड, प्रा. शेख साबिहा यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. डी. आर. घोलकर यांनी केले.
डॉ. सय्यद अझरुद्दीन यांनी त्यांच्या पदवी वितरण संदेशामध्ये आपले मनोगत व्यक्त करताना ‘तरुणांनो आपल्या आयुष्यातील महत्वाचे दिवस वाया घालवू नका, नोकरीच्या पाठीमागे न लागता स्वतःचा व्यवसाय सुरु करा.’ तसेच पुढे बोलताना त्यांनी लघु उद्योगातून व्यवसाय सुरु करून स्वतःचे मोठे व्यवसाय सुरु करून करोडो रुपयांची उलाढाल करणाऱ्या निवडक विद्यार्थ्यांची उदाहरणे त्यांनी उपस्थितांना दिली. पदवीधारक विद्यार्थ्यांना त्यांनी भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या या त्यांनी दिलेल्या संदेशाचे सर्वांना वाटप करण्यात आले.
याप्रसंगी मा.आ. सतीश (भाऊ) चव्हाण यांनी विद्यार्थी आणि पालक यांच्याशी संवाद साधताना महाविद्यालयात असणाऱ्या सोई सुविधांचा आपण पुरेपूर वापर करावा तसेच चांगले शिक्षण घेऊन नोकरी किंवा व्यवसायात प्रगती करा व आपल्या आई वडिलांच्या कष्टाचे पांग फेडा अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.
या प्रसंगी पदवी धारक विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पदवीचे वितरण करण्यात आले. यामध्ये पदवीधारक तसेच माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना पुणे, मुंबई व मोठमोठ्या महानगरातील महाविद्यालयाप्रमाणे आपल्या परिसरात मा. आ. सतीश (भाऊ) चव्हाण यांनी महाविद्यालय सुरु करून आधुनिक शिक्षणाची सोय केली एव्हढेच नव्हे तर परिसर मुलाखतीच्या माध्यमातून आमच्यासारख्या पदवीधारकांना नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांनी मा. आ. सतीश (भाऊ) चव्हाण यांचे आभार मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. सानिका बादुले हिने केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.