कार्यक्षेत्रातील संपूर्ण ऊसाचे गाळप करून गाळपास आलेल्या ऊसास योग्य भाव देणार – चेअरमन मा.श्री.बसवराज पाटील

लोहारा ( जि.धाराशिव ) : मुरूम येथील श्री. विठ्ठलसाई सहकारी साखर कारखान्याचा हंगाम 2023-24 साठीचा बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा कारखाना कार्यस्थळावर आजरोजी संपन्न झाला.
विट्ठलसाई हा कारखाना कारखान्याचे चेअरमन व माजी मंत्री श्री.बसवराज पाटील यांच्या नियोजनबध्द मार्गदर्शनाखाली सुरू असून हंगामासाठी करावयाची संपूर्ण कामे पूर्ण करण्यात आलेली आहेत. यावर्षी कारखाना कार्यक्षेत्रात लागण व खोडवा मिळून 12545 हेक्टर ऊसाची नोंद झालेली आहे. यापासुन जवळपास 14 लाख मे.टन ऊसाचे उत्पादन होईल असा अंदाज आहे. यासाठी पुरेशी वाहतुक यंत्रणा भरती करून त्याचे नियोजन करण्यात आले आहे. कारखाना कार्यक्षेत्रातील ऊसाची उपलब्धता विचारात घेवून कारखान्याच्या संचालक मंडळाने 5 लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. कारखान्याचा मोळी पुजनाचा कार्यक्रम दि.24 ऑक्टोबर 2023 रोजी विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर संपन्न होणार आहे. या हंगामात कार्यक्षेत्रातील संपूर्ण ऊसाचे गाळप करून गाळपास आलेल्या ऊसास योग्य भाव देणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन मा.श्री.बसवराज पाटील यांनी यावेळेस दिली. याप्रसंगी श्री.बापुराव पाटील, चेअरमन उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., उस्मानाबाद, कारखान्याचे व्हा.चेअरमन श्री. सादीकसाहेब काझी, उमरगा जनता सहकारी बँकेचे चेअरमन श्री. शरण पाटील तसेच कारखान्याचे संचालक सर्वश्री विट्ठलराव पाटील, शरणाप्पा पत्रिके, केशवराव पवार, माणिकराव राठोड, विट्ठलराव बदोले, संगमेश्वर घाळे, दिलीप पाटील, राजीव हेबळे, दत्तू भालेराव,शब्बीर जमादार,शिवलींग माळी, अॅड. विरसंगप्पा आळंगे, तसेच प्राचार्य दिलीप गरूड, माजी नगराध्यक्ष रशीद शेख, सुभाष गिरीबा, अॅड. पत्रिके, महालिंग बाबशेट्टी, योगेश राठोड, चंद्रशेखर पवार, माजी सभापती प.स. गोविंद पाटील, राजु तोडकरी, सतिश पवार, प्रमोद कुलकर्णी, आदी मान्यवर कार्यकारी संचालक श्री. एम.बी. अथणी व कारखान्यातील अधिकारी, कर्मचारी व कामगार उपस्थित होते.