राजकीयमहाराष्ट्रसामाजिक

सर्वधर्मसमभावाचा आदर्श; ‘मा. बाळासाहेब ठाकरे कन्या सन्मान योजने’तून मुस्लिम समाजातील नववधूस ५ ग्रॅम सोन्याची अंगठी

लोहारा (धाराशिव) : प्रतिनिधी
समाजसेवा ही धर्म, जात, पंथ किंवा राजकीय विचारांच्या चौकटीत अडकून न राहता मानवतेच्या भावनेतून केली पाहिजे, या विचाराचा प्रत्यय लोहारा शहरात पुन्हा एकदा आला. शिवसेना ठाकरे गटाच्या नगरसेविका सौ. मयुरी अमोल बिराजदार यांच्या संकल्पनेतून आणि तालुकाप्रमुख अमोल दत्तात्रय बिराजदार यांच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या ‘मा. बाळासाहेब ठाकरे कन्या सन्मान योजने’ अंतर्गत मुस्लिम समाजातील नववधूस ५ ग्रॅम सोन्याची अंगठी व भरपेरावा आहेर देऊन सर्वधर्मसमभावाचा प्रेरणादायी संदेश देण्यात आला.

खाजा मैनोद्दीन आरब ऊर्फ बिजू चाऊस यांच्या कन्या अनिसा हिचा विवाह धाराशिव येथील खाजा मनोद्दीन शेख यांचा मुलगा इरफान याच्याशी संपन्न झाला. या विवाह सोहळ्यात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नववधूस ५ ग्रॅम सोन्याची अंगठी व आहेर प्रदान करण्यात आला. या उपक्रमामुळे उपस्थितांमध्ये समाधान व्यक्त होत असून सामाजिक एकोपा आणि बंधुभावाचे दर्शन घडले.

लोहारा शहरातील प्रभाग क्रमांक ६ मधील प्रत्येक कन्येच्या विवाहप्रसंगी आनंदात सहभागी होण्याच्या उद्देशाने नगरसेविका सौ. मयुरी बिराजदार यांनी ‘मा. बाळासाहेब ठाकरे कन्या सन्मान योजना’ सुरू केली आहे. या योजनेतून प्रभागातील कोणत्याही धर्म, जात किंवा समाजातील मुलीच्या विवाहप्रसंगी ५ ग्रॅम सोन्याची अंगठी भेट दिली जाते. त्यामुळे कन्येच्या कुटुंबाला आर्थिक मदत तर मिळतेच, शिवाय समाजातील लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांच्यातील जिव्हाळ्याचे नातेही अधिक दृढ होत आहे.

या योजनेचा शुभारंभ रघुवीर घोडके व आशा घोडके यांच्या कन्या राधिका घोडके यांच्या विवाह सोहळ्यात खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आला होता. त्यानंतर लोहारा येथील वैष्णवी निर्मळे, अंबाजोगाई येथील सीमा निर्मळे, मुस्लिम समाजातील शमिनबी खुट्टेपड, अश्विनी स्वामी आणि शीतल जाधव या कन्यांना देखील विवाहप्रसंगी सोन्याची अंगठी भेट देण्यात आली. आता अनिसा हिच्या विवाहप्रसंगीही या योजनेचा लाभ देत सर्वधर्मसमभावाची परंपरा कायम राखण्यात आली आहे.

HTML img Tag Simply Easy Learning

विशेष म्हणजे या योजनेत लाभार्थी निवडताना धर्म, जात, पंथ किंवा राजकीय विचारांचा कोणताही भेदभाव केला जात नाही. समाजातील प्रत्येक कन्या ही आपल्या घरातील कन्येसमान आहे, या भावनेतून हा उपक्रम राबविला जात आहे. त्यामुळे ही योजना केवळ मदतीचा उपक्रम न राहता सामाजिक सलोखा, बंधुभाव, समानता आणि मानवतेची मूल्ये जपणारी चळवळ ठरत आहे.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मांडलेल्या “८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण” या विचारसरणीला अनुसरून ही योजना सुरू करण्यात आली आहे. आज या उपक्रमामुळे विविध समाजघटकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण होत असून सामाजिक ऐक्य अधिक मजबूत होत आहे. हिंदू-मुस्लिम समाजातील नागरिक एकत्र येऊन नवदाम्पत्याला शुभेच्छा देताना दिसत असल्याने या योजनेचे महत्त्व अधिक अधोरेखित होत आहे.

यावेळी माजी सरपंच शंकरआण्णा जट्टे, माजी नगरसेवक आयुब शेख, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते बाबा शेख, तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, माजी पंचायत समिती सदस्य सुधीर घोडके, भाजपचे तालुका सरचिटणीस इकबाल मुल्ला, एमआयएम तालुकाप्रमुख हमजा खुट्टेपड, पत्रकार नीलकंठ कांबळे, रघुवीर घोडके, प्रेम लांडगे, जब्बार मुल्ला, महेबूब अरब, खाजा मैनोद्दीन अरब, आतिक अरब यांच्यासह आरब व शेख परिवारातील अनेक सदस्य उपस्थित होते.

सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले. समाजातील प्रत्येक कन्येच्या आनंदात सहभागी होण्याचा हा प्रयत्न पुढील काळातही अधिक व्यापक स्वरूपात सुरू राहणार असल्याची भावना नगरसेविका सौ. मयुरी बिराजदार यांनी व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!