लोहारा ( जि.धाराशिव ) : छात्र प्रबोधन -ज्ञानप्रबोधिनी, पुणे व ज्ञानप्रबोधिनी, हराळी यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, दिनांक २७-२-२०२४ रोजी ज्ञान प्रबोधिनी विद्यालय, हराळी येथे कुमार साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले.
या संमेलनात ज्ञानप्रबोधिनी, हराळीचे विद्यार्थी आणि पंचक्रोशीतील शाळांमधील एकूण २५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
संमेलनात मार्गदर्शन करण्यासाठी पाच सुप्रसिद्ध लेखक, कवी व लेखिका उपस्थित होत्या.
मा. आश्लेषा महाजन, मा. रेणू पाचपोर, मा. फारुक काझी, मा. स्वाती ताडफळे व मा. श्वेता रानडे या मान्यवरांनी आपल्या उपस्थितीने संमेलनाची शोभा द्विगुणित केली.
छात्र प्रबोधन तर्फे मा. शिल्पाताई कुलकर्णी व हराळी ज्ञान प्रबोधिनीच्या तर्फे मा. श्रुतीताई फाटक यांनी संमेलनाच्या नियोजनाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली.
कुमारांमध्ये वाचनाची गोडी वाढावी, भाषेची सौंदर्यस्थळे पाहायला शिकावे, अभिव्यक्ती करण्यास सक्षम व्हावे आणि परिणामी मराठी भाषेचे प्रेम विद्यार्थ्यांना लागावे या उद्देशाने हे संमेलन आयोजित करण्यात आले.
मान्यवर साहित्यिकांच्या मार्गदर्शनाखाली कथालेखन, काव्यलेखन व काव्यवाचन, प्रवासवर्णन, व्यक्तिचित्रण व अभिवाचन अशा विविध विषयांवर कार्यशाळा घेण्यात आल्या. साहित्यिकांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत या विषयांमधील सौंदर्य व आनंद उलगडून दाखवला व त्यांनी बोलते व्हावे, लिहिते व्हावे यासाठी त्यांना प्रेरणा व प्रोत्साहन दिले. सर्व विद्यार्थ्यांना या कार्यशाळा खूप आवडल्या व खूप उत्साहाने त्यांनी सहभाग घेऊन उत्स्फूर्त लेखन व वाचन केले. मान्यवरांनाही विद्यार्थ्यांचा उत्साह भावला. नंतरच्या *साहित्यिकांशी गप्पा* या सत्रात विद्यार्थ्यांनी त्यांच्या मनात येणारे प्रश्न साहित्यिकांना विचारावयाचे होते. येथेही मुलांनी खूपच चांगले प्रश्न विचारून साहित्यिकांचा लेखनप्रवास जाणून घेतला.
भोजनानंतरच्या सत्रामध्ये मराठी भाषेची गंमत शिकवणारे कल्पक खेळांच्या १० स्पर्धा घेण्यात आल्या. यातही सर्वांनी खूप उत्साहाने भाग घेतला. विजेत्यांना लगेचच बक्षिसे देण्यात आली.
या खेळांमुळे शब्दसंग्रह वाढण्यास मदत झाली. यानंतर संमेलनाच्या समारोपप्रसंगी काही विशेष गुणी विद्यार्थ्यांनी अभिवाचन, काव्यवाचन इ. सादर केले. हराळी ज्ञान प्रबोधिनी केंद्रप्रमुख मा. अभिजितदादा यांनी मार्गदर्शनपर भाषण केले. म्हणी कशा तयार होतात याची गंमतीदार गोष्ट सांगून त्यांनी भाषेवर प्रेम करायचा संदेश दिला.
संध्याकाळी सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले व संमेलनाची सांगता झाली.
मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने हे अत्यंत सुनियोजित व मराठीचा गौरव करणारे संमेलन यशस्वीरीत्या आयोजित झाले.