किती मुलींना वाटतं, आपण मुलगा असतो तर बरं झालं असतं ?’ – कु. इफत खुटेफड

लोहारा / प्रतिनिधी: लोहारा शहरातील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयात १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याच प्रसंगी करिअर मार्दशन कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला.
बायोटेक्नॉलॉजी क्षेत्रातील तज्ज्ञ व फरहत सोशल वेलफेअर फाउंडेशनच्या संचालिका कु.इफत कलीम खुटेफड यांनी मेडिकल इलेक्ट्रॉनिक इंजिनियरिंग क्षेत्रामध्ये असणाऱ्या करिअरच्या विविध संधी या विषयावर मार्गदर्शन केले. ‘किती मुलींना वाटतं, आपण मुलगा असतो तर बरं झालं असतं ?’ या त्यांच्या प्रश्नाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले त्यातून त्यांनी आज मुलगा आणि मुलगी असा कुठलाही भेद आता राहिला नाही, ग्रामीण भागातील मुली देखील प्रत्येक क्षेत्रात आज अग्रेसर आहेत, तुम्ही देखील देश-विदेशातील संशोधनासारख्या महत्वपूर्ण क्षेत्रात यश प्राप्त करू शकता असा संदेश त्यांनी दिला.
वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअरच्या विविध संधी या विषयावर श्रीगिरे हॉस्पिटल चे संचालक डॉ. हेमंत श्रीगिरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना एमबीबीएस, बीएएमएस, बीडीएस, बीएचएमएस याचबरोबर फिजिओथेरपी, नर्सिंग, पॅरामेडिकेकल कोर्सेस, डीएमएलटी अशा विविध संधीविषयी मार्गदर्शन केले.
फार्मासिस्ट श्री. कलीम खुटेफड यांनी फार्मासी क्षेत्राविषयी मार्गदर्शन केले तसेच विद्यार्थी जीवन जगत असताना जर आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण घेता येऊ शकत नसेल तर आपण छोटे डिप्लोमा कोर्सेस करून अर्थार्जन करू शकता व आपले शिक्षण पूर्ण करू शकता असा संदेश देऊन अशा डिप्लोमा कोर्सेसच्या यादीचे वाटप त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केले. तसेच अनेक दवाखान्यामध्ये यांत्रिकरण झाले परंतु अशी आधुनिक उपकरणे चालविण्यासाठी कुशल मनुष्यबळ मात्र उपलब्ध होत नाही त्यामुळे ग्रामीण भागातील मुलांना या क्षेत्रात उत्तम करिअर करता येऊ शकते असा आत्मविश्वास त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण केला.
देवगिरी महाविद्यालयातील भौतिक शास्त्र विभागाचे प्रा. के. बी. पतंगे यांनी इंजिनिअरींग क्षेत्रातील नवीन संधीविषयी माहिती दिली तसेच बीसीए व बीसीएस सारख्या पदवी करून लाखो रुपयांचे पॅकेजेस विद्यार्थी प्राप्त करत असल्याची माहिती त्यांनी दिली.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. आर. घोलकर यांनी नवीन शैक्षिणक धोरण २०२० ची अंमलबजावणी लवकरच होणार असून यामुळे ग्रामीण भाग व शहरी भाग यामध्ये शैक्षणिक क्षेत्रात असणारी तफावत कमी होण्यास मदत होईल अशी माहिती आपल्या अध्यक्षीय समारोपात दिली. तसेच महाविद्यालयात चालणाऱ्या बीए, बी.कॉम, बी.एस्सी, बी. एस्सी (कॉम्पुटर सायन्स), स्पर्धा परीक्षा केंद्र व उद्योजकता विकास केंद्र याविषयी उपस्थितांना माहिती दिली.
व्यासपीठावर देवगिरी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. एन. जी. गायकवाड, प्रा. शेख सबिहा, प्रा. के. बी. पतंगे, कु. इफत खुटेफड, डॉ. हेमंत श्रीगिरे, श्री. कलीम खुटेफड, प्राचार्य डॉ. डी. आर. घोलकर, उपप्राचार्य प्रा. यशवंत चंदनशिवे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी तसेच पालकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. सानिका बादुले हिने केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. प्रशांत माने व प्रा. राम कदम यांनी मेहनत घेतली तर उपप्राचार्य प्रा. यशवंत चंदनशिवे यांनी उपस्थितांचे आभार मानले.