लोहारा : पीक विम्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा आणि पीक कापणी प्रयोग (CCE) प्रक्रियेतील कथित विसंगतींची वस्तुस्थिती समोर यावी, या मागण्यांसाठी लोहारा तालुका काँग्रेस कमिटीने बुधवारी तहसीलदारांना निवेदन सादर केले. माकणी, जेवळी व धानुरी मंडळातील पीक कापणी प्रयोगांची संपूर्ण माहिती तातडीने जाहीर करावी, अन्यथा १२ ऑगस्ट २०२६ रोजी लोहारा येथे रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा काँग्रेसने दिला.
निवेदनात संबंधित मंडळांतील पीक कापणी प्रयोगांचे पंचनामे, नोंदवही, अहवाल आणि प्रमाणित प्रती तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. पीक विमा भरूनही अनेक शेतकरी लाभापासून वंचित राहिल्याने त्यांच्या मनात संशयाचे वातावरण निर्माण झाले असून, संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे सार्वजनिक झाल्यास सत्य परिस्थिती स्पष्ट होईल आणि न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा होईल, असे काँग्रेसने निवेदनात म्हटले आहे.
“शेतकऱ्यांच्या हक्काचा प्रश्न कोणत्याही परिस्थितीत दुर्लक्षित होऊ देणार नाही. प्रशासनाने तातडीने माहिती उपलब्ध करून शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करावा. अन्यथा पीक विमा वंचित शेतकऱ्यांसह काँग्रेसच्या नेतृत्वाखाली तीव्र रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल,” असा ठाम इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला.
यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दयानंद पाटील, श्यामसुंदर तोरकडे, अॅड. सयाजी शिंदे, बसवराज पाटील, अॅड. माशाळकर, प्रीतम शिंदे, युवक शहराध्यक्ष प्रकाश होडराव, विजयकुमार गोफणे, मनोहर पाटील, राजू सोलंकर, मारुती रोडगे, संदीप पाटील, शिवानंद तोरकडे, गौतम माटे, विनोद थोरात, रोहित शिंदे, करण कांबळे, पुरुषोत्तम सितापुरे, ओम लोभे, यल्लाली एकुंडे, शेखर चौगुले, उमर शेख, योगेश मिटकरी, दिलीप हुंडापुल्ले, काशिनाथ जट्टे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी व काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.